पुण्यातून पळविलेल्या २ वर्षांच्या मुलीची तुळजापूरमधून सुटका : पाच जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज येथून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीची भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुखरूप सुटका केली. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भीक मागण्यासाठी या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनिल सिताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०), गणेश बाबू पवार (वय ३५), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे) यांचा समावेश आहे.
ही घटना २५ जुलै व २६ जुलैच्या मध्यरात्री कात्रज येथील वंडरसिटी झोपडपट्टी परिसरात घडली होती. याबाबत धनसिंग हनुमंत काळे (वय २५, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. काळे यांच्या पत्नीने त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला झोळीत झोपवले होते. दरम्यान दुसरी मुलगी रडल्याने त्यांना जाग आली.
झोळीत पाहिले असता, ती मुलगी दिसून आली नाही. मुलगी हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
कात्रज परिसरापासून पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत पोलिसांनी तब्बल १४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात दोन पुरुष आणि एक महिला मिळून मुलीला पुणे रेल्वे स्टेशनकडे घेऊन जाताना दिसले. स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये त्यांच्यासोबत आणखी दोन जण असल्याचेही आढळून आले.
पोलिसांनी बातमीदारामार्फत पडताळणी केली असता, हे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव पोलिसांच्या मदतीने सुनिल, शंकर आणि शालुबाई यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अपहरण झालेली मुलगीही मिळून आली. त्यानंतर गणेश आणि मंगल या दोघांनाही अटक करण्यात आली.पोलिसांनी तिघांना तुळजापूर येथून आणि उर्वरित दोघांना खडकी येथील रेंजहिल येथून अटक केली. आरोपींना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, अंजुम बागवान, जितेंद्र कदम, कुमार घाटगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे तसेच गुन्हे शाखेतील निखिल जाधव, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, सद्दाम तांबोळी, शुभम देसाई, मयुर भोसले, निलेश साबळे, अमित जमदाडे, धाराशिव गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समाधान वाघमारे यांनी पार पाडली आहे.
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार –
या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. भोसले याच्याविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन, लोहा पोलिस ठाण्यात तीन, माकोळी व चाकूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. शंकर हा अपंग असून पुणे स्टेशन परिसरात भीक मागण्याचे काम करतो. त्याच्यावरही तुळजापूर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पवारविरुद्ध भिगवण पोलिस ठाण्यात दोन, तर हडपसर व इंदापूर पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
