महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रूट मार्च दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत बार्शी शहरातील प्रमुख मार्गांवर काढण्यात आला.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. प्रितम यावलकर, तसेच बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.
या रूट मार्चमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स, हकीमपेटा, सिकंदराबाद, तेलंगणा येथून आलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक ए. सरस्वती, पोलीस निरीक्षक डी. एस. मस्कर, भगवंत पारीश यांच्यासह ३५ पोलीस अंमलदार, तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे २५ पोलीस अंमलदार आणि सोलापूर ग्रामीण हेडक्वार्टरमधील रॉयल कंट्रोल पोलीस फोर्सचे अंमलदार सहभागी झाले होते.
या पथसंचलनात दंगा नियंत्रण वाहन (Riot Control Vehicle) तसेच हत्यारबंद दस्ता (Armed Police Squad) यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण रूट मार्च अधिक प्रभावशाली आणि लक्षवेधी ठरला.
या पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिस दलाने नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास निर्माण केला असून, शांततापूर्ण वातावरणात येणारे दिवस साजरे करण्याचा संदेश दिला. बार्शी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा भक्कम निर्धार दाखवणारा हा उपक्रम यशस्वी आणि प्रशंसनीय ठरला.
