मुंढवा पोलिसांनी १२ तासांत केली कारवाई : मौजेसाठी मागितली होती खंडणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यावसायिकाला व्हॉट्सअॅप कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. मौजमजेसाठी पैसे मिळावेत, या कारणासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.
अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. घोरपडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत राजू तपशीर खान (वय ४३, रा. भिमनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू खान हे २० वर्षांपासून लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करत आहेत.
२६ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. “कल्याणी में तेरा साईड चालू है, तूने कल्याणी में बहुत ज्यादा पैसे कमाए हैं. कल मुझे ५० लाख रुपये चाहिए, बाकी मुझे कुछ मालूम नहीं,” असे बोलून खंडणी मागण्यात आली.
त्यानंतर २७ जुलै रोजी दुपारी पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून धमकी देण्यात आली. “मै तुम्हारा मर्डर गिरायेगा,” असे म्हणत पुन्हा धमकावण्यात आले. रात्री त्याने २० लाख रुपये मागितले आणि बाहेरच्या देशातून बोलत असल्याचे सांगितले.
“माझ्याकडे इतके पैसे नाहीत,” असे त्यांनी सांगितल्यावर त्याने पुन्हा धमकावले. २७ जुलै रोजी रात्री पुन्हा फोन आला. त्यानंतर २९ जुलै रोजी रात्री फोन करून “पैसे तयार हैं क्या?” असे विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले की पैसे आणले होते, पण तुमचा फोन न आल्याने परत केले.
यावर त्याने “उद्या रात्री फोन करतो, पैसे तयार ठेव,” असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. गुन्हा केल्यानंतर आरोपी फोन करून पळून गेला होता. मुंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर आणि त्यांच्या पथकाने या खंडणी मागणाऱ्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले.
आरोपी फिर्यादीस घोरपडी येथे भेटण्यास येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून ३० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता आरोपीला अटक करण्यात आली.
ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक पोलिस फौजदार राजू कदम, पोलिस हवालदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, राहुल मोरे, शिवाजी धांडे, पोलिस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर, योगेश राऊत यांनी पार पाडली.
