२ लाखांच्या ५ मोटारसायकली जप्त : ‘इझी मनी’ मिळवण्यासाठी केली चोरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवून चौकशी केल्यावर त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.शेतीकाम करणाऱ्या या तरुणांनी ‘इझी मनी’ मिळवण्यासाठी चोऱ्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
नरेंद्र सुखदेव झुरंगे (वय १९), सुयश सुनिल दुधाळे (वय १९), प्रज्वल गंगाधर टिळेकर (वय १९, तिघे रा. खळद, एखदपूर, ता. पुरंदर). आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलिस पथक २७ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना जांभुळवाडी तलावाशेजारील आंबेगाव गावठाणाकडे जात असलेल्या तिघांवर संशय आल्याने त्यांना थांबवून नाव व पत्ता विचारण्यात आला.
त्यांच्याकडील मोटारसायकलींची कागदपत्रे मागितली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल ही आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे समजल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीत त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एक व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अशा एकूण पाच मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ लाख रुपयांच्या ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर व रतिकांत काळे, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, बापूर भिंगारे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरीश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे तसेच ‘कॉप्स २४ मार्शल’चे दीपक गायकवाड, दत्तात्रय मेंगाळ, सागर खंडागळे, किरण कांबळे यांनी केली आहे.
