समजुतीचा करार करून परस्पर दुसऱ्याला विकली जमीन : मार्केटयार्डमधील व्यापाऱ्याला गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जमिनीच्या खरेदीसंदर्भात समजुतीचा करार करून ९० लाख रुपये घेऊनही तीच जमीन परस्पर दुसऱ्याला विकून मार्केटयार्डमधील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषकुमार अगरवाल (वय ३७, रा. बिबवेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरंगराव उर्फ सावळेराव ठुबे (वय ८१), विजय ठुबे (वय ४४, दोघे रा. वाकडेवाडी, शिवाजीनगर) आणि प्रताप ठुबे (वय ४४, रा. खडकवासला) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडला.
कशी झाली फसवणूक? फिर्यादी मनिषकुमार अगरवाल यांचे मार्केटयार्ड येथे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे. त्यांना जमीन खरेदी करायची होती. मध्यस्थ प्रशांत बोरा यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू रितेश अगरवाल यांना खराडी येथील ५५ गुंठ्यांची मोकळी जागा पसंत पडली. बोरा यांनी जमिनीचे मालक श्रीरंगराव ठुबे यांच्याशी ओळख करून दिली.
वकील पंकज भंडारी यांच्या सल्ल्यानुसार जमीन खरेदीसाठी २७ कोटी ५० लाखांचा व्यवहार ठरवण्यात आला. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२३ रोजी मार्केटयार्ड येथील ‘शिव कैलास ट्रेडिंग कंपनी’त समजुतीचा करार झाला.
ठरल्याप्रमाणे, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मनिषकुमार यांनी श्रीरंगराव ठुबे यांच्या बँक खात्यात ९० लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागात जाऊन संबंधित जमिनीबाबत माहिती घेतली असता ती जमीन ‘रेसिडेन्शियल’ नसून ‘अॅमेनिटी स्पेस’ म्हणून नोंदणीकृत असल्याचे समोर आले.
त्यांनी ठुबे यांना विचारणा केली असता, “कागदपत्रे दोन दिवसांत देतो” असे उत्तर देण्यात आले पण ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी आग्रह केल्यानंतरही ठुबे टाळाटाळ करीत होते. शेवटी, ८ मे २०२४ रोजी ठुबे यांनी तीच जमीन मे. मकवाना आणि तन्मय रिअल्टर्स यांना परस्पर विकल्याचे उघड झाले.
मनिषकुमार अगरवाल यांनी त्यानंतर वकिलामार्फत नोटीस पाठवली. मात्र, त्याला कोणतेही उत्तर आले नाही आणि त्यांनी घेतलेले ९० लाख रुपयेही परत केले नाहीत. अखेर त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक सिसाळ करत आहेत.
