‘रिसर्च मेथोडोलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स’वर आधारित मार्गदर्शक ग्रंथ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुधीर पंड्या आणि डॉ. वैभव वैद्य यांनी संयुक्तरित्या “कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथोडोलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स” या विषयावर पुस्तकाचे लेखन केले आहे. हे पुस्तक शाश्वत प्रकाशन, बिलासपूर यांच्यातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक फार्मसीच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी केले. विद्यार्थीनिष्ठ दृष्टिकोनातून सुलभ भाषेत लेखन केल्याबद्दल त्यांनी लेखकांचे अभिनंदन केले.
डॉ. सुधीर पंड्या यांना औषध उद्योगातील प्रत्यक्ष कार्यानुभव आहे, तर डॉ. वैभव वैद्य यांना १७ वर्षांहून अधिक काळाचा अध्यापनाचा अनुभव आहे. अभ्यासक्रम समजण्यास मदत करणारी सुलभ रचना, स्पष्ट संकल्पना आणि संशोधनाचे मूलभूत ज्ञान या पुस्तकाच्या वैशिष्ट्यांपैकी आहेत.
विद्यार्थ्यांना संशोधन विषयक संकल्पना समजून घेण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.
