बाणेरमधील घटनेत ठेकेदारासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बाणेर भागातील एका सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. या कामगाराच्या सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यामुळे कामगाराच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिसांनी ठेकेदार तसेच सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत क्षीरसागर यांचा मुलगा अमोल (वय ३४) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी रमेश वामन लोंढे, सोसायटीचे चेअरमन श्रीकृष्ण सराफ आणि सेक्रेटरी श्रीकृष्ण बिडवे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर येथील ऋतुरंग पार्कमधील त्रिमूर्ती हिलव्ह्यू सोसायटीत २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारातील कंपाऊंडलगत असलेली झाडे तोडण्यासाठी ठेकेदारांना काम देण्यात आले होते. झाडे तोडताना कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता फिर्यादीचे वडील लहू क्षीरसागर व इतर कामगारांना झाडे तोडण्यास सांगितले.
काम करताना हयगयीने व निष्काळजीपणे लहू क्षीरसागर यांना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न दिल्यामुळे, झाड तोडत असताना ते खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थिटे करत आहेत.
