कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीत रविवारी केली होती आयोजित बैलगाडा शर्यत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज घाटातील गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगराजवळ रविवारी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. विना परवाना आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये आवश्यक नियमांचे पालन न केल्यामुळे शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकांवर व त्यात सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांसह १५ ते १६ जणांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार सचिन तात्याराव पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आदित्य सणस, ऋषभ भालचंद्र धावडे, हेमंत मुकुंद बेंद्रे, रोहित भारत रणमळे, आदित्य मोहन शिंदे, ओमकार इंगवळे, दिंगबर होळवले, प्रथमेश गातळे, अनिकेत बगडे, सादिक शिंदे, सुरज मिंडे, लखन, विक्रम पवार, शुभम, अक्षय वाल्हेकर व इतर अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांशी क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या कलमाचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगराजवळ मोकळ्या मैदानात रविवारी दुपारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी आयोजकांनी पोलीस तसेच प्रशासनाची परवानगी न घेता परस्पर शर्यत भरवली.
बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त, शर्यतीच्या ठिकाणी कोणतेही बॅरेकेटिंग नव्हते. तसेच सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता बैलगाडा शर्यत भरवून, तेथे जमलेल्या लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका पोहोचेल असे कृत्य करण्यात आले.
या आयोजकांना व बैलगाडा मालकांना चालू असलेली बैलगाडा शर्यत थांबविण्याबाबत तोंडी आदेश देण्यात आले. तरीदेखील त्यांनी बैलगाडा शर्यत न थांबविता ती चालूच ठेवली. बैलांना क्रूरपणे चाबकाचे फटके देत राहिले व सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आरडा ओरडा करत पोलिसांच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास सहाय्यक पोलीस फौजदार भोसले करीत आहेत.
