सेनापती बापट रोडवरील कार्यालयातून आर्थिक फसवणूक : आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इन्फीनाईट बेकॉन इंडिया व ट्रेडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमित चंद्रशेखर बोरसे (वय ४५, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ जगन्नाथ अवताडे, अगस्त राहुल मिश्रा, राहुल श्यामराव काळोखे, सचिन लक्ष्मण खडतरे, चेतन धर, प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, ययाती राहुल मिश्रा व गौरव देवीदास सुखदेवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही फसवणूक ३ ऑक्टोबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान सेनापती बापट रोडवरील प्राईड कुमार सिनेट येथील कार्यालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरसे यांची ‘वल्डटेक सोल्युशन्स’ नावाची फर्म आहे. त्यांच्याच एका ओळखीच्या व्यक्तीने नवनाथ अवताडे यांच्या कंपनीची माहिती दिली होती.
२०२३ साली बोरसे यांनी मॉडेल कॉलनीतील कार्यालयात जाऊन अवताडे यांची भेट घेतली. तेव्हा अवताडे यांनी सांगितले की, त्यांची कंपनी SEBI नोंदणीकृत असून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ६ ते ८ टक्के नफा दिला जाईल.
गुंतवणुकीसाठी क्लायंट आयडी आणि पासवर्ड दिला जाईल, गुंतवलेली रक्कम आणि नफा ‘ट्रेडस अॅप’ वर ऑनलाइन पाहता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, दर महिन्याच्या ३० तारखेला ‘विड्रॉवल रिक्वेस्ट’ टाकल्यानंतर रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले.
सुरुवातीला बोरसे यांनी ११ लाख रुपये गुंतवले. त्यावर जून २०२४ मध्ये मुळ रक्कम व व्याजासह परतावा मिळाल्याने त्यांचा कंपनीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.
फिर्यादी हे ‘ट्रेडस अॅप’वर वेळोवेळी नफा पाहात होते. परंतु एप्रिल २०२५ मध्ये रक्कम काढण्यासाठी त्यांनी विड्रॉवल रिक्वेस्ट टाकली असता, १२ दिवस उलटूनही पैसे आले नाहीत. त्यानंतर त्यांनी संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.
तेव्हा त्यांना आपल्या फसवणुकीची जाणीव झाली व त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत. या संचालकांनी आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या आरोपींच्या मागावर तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
