सोसायटीच्या अमेनिटीज न देता ३ कोटींची फसवणूक : वाघोलीतील प्रकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाघोली येथील साखरे गार्डियन ईस्ट मेडोज या सोसायटीस करारनाम्यानुसार आवश्यक सुविधा (अमेनिटीज) न देता तसेच कन्व्हेयन्स डीड न केल्याने, तसेच देखभाल खर्च न उचलल्याने जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गार्डियन प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स तसेच जमिनमालकांविरुद्ध महाराष्ट्र मालकी हक्क फ्लॅट अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विश्वनाथ शांताराम घुले (वय ४४, रा. साखरे गार्डियन ईस्ट मेडोज, वाघोली) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गार्डियन प्रमोटर्स आणि डेव्हलपर्सचे संचालक मनीष मुरलीधर साबडे, मनीष माधव सोमण तसेच जमिनमालक उषा यशवंत साखरे आणि यशवंत गोविंद साखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२२ पासून आजपर्यंत सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादींनी मे २०१६ मध्ये गार्डियन प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सकडून साखरे गार्डियन ईस्टर्न मेडोज सहकारी गृहरचना संस्था (फेज १) मधील फ्लॅट बुक केला होता. २०१८-१९ मध्ये पाच सोसायट्यांचे फ्लॅटचा ताबा देणे बंधनकारक होते, मात्र बिल्डरने वेळेत ताबा दिला नाही. त्यानंतर सभासदांनी महारेराकडे तक्रार केली.
महारेराने दोन्ही पक्षांना बसून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. क्रेडाई पुणे व मुंबई ग्राहक पंचायत यांच्या मध्यस्थीने ऑगस्ट २०२० मध्ये सोसायटी स्थापन करून रोजनामा करण्यात आला. त्यानुसार, बिल्डरने सर्व सुविधा, भोगवटा प्रमाणपत्र (OC) आणि इतर बाबी देण्याचे ठरले होते.
मात्र, प्रत्यक्षात त्या सुविधा मिळाल्या नाहीत. २०२२ मध्ये काही लोकांनी फ्लॅटचा ताबा घेतला, पण ये-जा करण्यासाठी फक्त एकच मार्ग उपलब्ध होता. कंपाऊंड वॉल पूर्ण करण्यात आली नाही. सोसायटीतील सांडपाणी बाहेर टाकण्यासाठी व्यवस्था केली नाही.
पार्किंग प्लॅनप्रमाणे दिले नाही. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय झाली नाही. कचरा व्यवस्थापन व महापालिकेकडून नळजोडणी करण्यात आलेली नाही बिल्डरने कन्व्हेयन्स डीड करणे बंधनकारक असून, तोपर्यंत संपूर्ण देखभाल खर्च उचलणेही त्याची जबाबदारी आहे.
मात्र, बिल्डरने २०२२ ते २०२५ या कालावधीत पाच सोसायट्यांचा देखभाल खर्च न उचलल्याने सभासदांना स्वतः मिळून ₹२,९८,८२,२५२ रुपये खर्च करावे लागले. हा खर्च मागितला असता बिल्डरने नकार दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करत आहेत.
