‘श्रावणक्वीन २०२५’च्या स्पर्धकांना प्रेरणादायी मार्गदर्शन : सकारात्मकता, स्वयंप्रेरणा व सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘श्रावणक्वीन २०२५’च्या अंतिम फेरीसाठी निवडलेल्या १६ स्पर्धकांना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी शनिवारी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “बदलांना स्वीकारा, इतरांशी तुलना टाळा आणि आत्मविश्वासाने पुढे चला, तोच तुम्हाला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देईल,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
शनिवारी स्पर्धकांनी बावधन येथील सूर्यदत्ता कॅम्पसला भेट दिली. या वेळी झालेल्या मार्गदर्शनपर सत्रात डॉ. चोरडिया यांनी स्पर्धकांना महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलाखा यांनीही संवाद साधत मुलींचा स्पर्धेचा ताण हलका केला. प्रत्येक स्पर्धकाला मुकुट परिधान करून गौरविण्यात आले.
डॉ. चोरडिया म्हणाले, “जग वेगाने बदलत आहे. या बदलांना स्वीकारण्याची तयारी ठेवा. स्पर्धेला तोंड देताना खचून जाऊ नका. या स्पर्धेनंतर तुमच्या करिअरचा खरा प्रवास सुरू होईल. इतरांशी स्वतःची तुलना न करता प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमच्यात इतरांपेक्षा वेगळा ‘स्पार्क’ आहे, म्हणूनच तुम्ही निवडल्या गेला आहात.”
ते पुढे म्हणाले, “स्वयंप्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वीकार या गोष्टी उत्तम कामगिरीस प्रवृत्त करतात. रोज काहीतरी नवं शिका. व्यायाम आणि संतुलित आहाराने फिटनेस मिळतो. प्राणायामाने चेहऱ्यावर तेज येते, मंत्रोच्चाराने सकारात्मकता वाढते. मानसिकदृष्ट्या निरोगी राहिलो तरच मेंदूला ऊर्जा मिळते. तणावपूर्ण जीवनशैलीत हे अत्यावश्यक आहे.”
ते अधिक सांगतात, “काही काळ गॅझेटपासून दूर राहा आणि वाचनाला वेळ द्या. स्वतःसोबत वेळ घालवल्यावर खऱ्या अर्थाने विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्रोत विपुल आहेत; त्यामुळे वेळ कुठे खर्च करायचा आणि तो गुणवत्तापूर्ण कसा होईल, याला प्राधान्य द्या.
सौंदर्य, उंची, पेहराव या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी आत्मविश्वास मोलाची भर घालतो आणि तोच तुम्हाला मुकुट मिळवून देईल.” या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे स्पर्धकांना स्पर्धेकडे नव्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पाहण्याची नवी दिशा मिळाली.
