ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याचे दागिने मागवून केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची मागणी नोंदवून, ती स्वीकारल्यानंतर हे दागिने आणखी पुढे विक्री करून त्याच्यापासून पैसे न आल्याचे सांगत पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सराफाची तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत ओंकार अशोक अष्टेकर (वय ३६, रा. करिश्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विशाल फत्तेचंद पुनमिया (वय ४३, रा. बांद्रा, मुंबई), हितेश फत्तेचंद पुनमिया (वय ४५, रा. सिद्धी सिद्धाचल, गुलटेकडी), आणि पवन कुमार जोरा (रा. बडा बाजार, कोलकाता, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सदाशिव पेठेत ‘अभिषेक अशोक अष्टेकर’ या नावाने वडिलोपार्जित सराफ व्यवसाय आहे. त्यांची २०१५ मध्ये व्यवसायाच्या माध्यमातून विशाल पुनमिया व हितेश पुनमिया या भावांशी ओळख झाली. ते फिर्यादी यांच्याकडून मौल्यवान हिरे व इतर दागिने घेऊन ते त्यांच्या ओळखीच्या व्यापार्यांना विकून देत असत. अशा प्रकारे वेळोवेळी मौल्यवान हिरे व दागिने घेऊन त्यांनी रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात त्याचा मोबदला दिला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसला होता.
२०२३ मध्ये विशाल पुनमिया हे पवनकुमार जोरा (रा. कोलकाता) यांना घेऊन आले. त्यांचे कोलकात्यात ‘श्रवण ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. मोठ्या प्रमाणावर मौल्यवान हिरे व इतर दागिने घेऊन ते चांगल्या किंमतीत विकत असतात, असे त्यांनी सांगितले. जोरा हे मोठे व्यापारी असल्याचे सांगून दोघा भावांनी त्यांची हमी दिली.
२० जून २०२५ रोजी विशाल पुनमिया याने फिर्यादींना फोन करून सांगितले की, पवनकुमार जोरा यांनी मौल्यवान वस्तूंची मागणी केली आहे, त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तू उपलब्ध करून द्या. “मी त्या वस्तू भाऊ हितेश पुनमिया यांच्यामार्फत पोहोच करतो,” असे सांगितले. मालाचे पैसे कधी देणार, असे विचारल्यावर विशाल याने सांगितले की, पवनकुमार जोरा एका आठवड्यात पैसे देतील.
त्यांच्या मागणीनुसार सॉलिटेअर हिऱ्याची अंगठी, डायमंडच्या जोड बांगड्या, डायमंडची सिंगल माळ असे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे दागिने त्यांचा भाऊ घेऊन गेला. सिक्युरिटी म्हणून विशालने दोन चेक दिले होते. त्यानंतर पवनकुमार जोरा याने आपल्या लेटरहेडवर या वस्तू मिळाल्याचे पत्र हितेश पुनमिया याने २८ जून २०२५ रोजी आणून दिले.
एक आठवड्यानंतर त्यांनी विशाल आणि हितेश यांच्याकडे विचारणा केली असता ते नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, “पवनकुमार जोरा आता फोन उचलत नाही, त्याच्याशी संपर्क होत नाही, तो भेटत नाही.”
त्यावरून फिर्यादींच्या लक्षात आले की, तिघेही व्यापारी असल्याने त्यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विश्वास संपादन करत २ कोटी ८० लाखांचे हिरेजडित दागिने घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावली व अपहार करत फसवणूक केली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे तपास करीत आहेत.
