३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड : जुगार खेळणाऱ्यांकडे मागितली होती लाच
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर न्यायालयाने त्या चौघांना प्रत्येकी २०० रुपये दंड करून सोडून दिले. या गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
पोलीस हवालदाराचे नाव रमेश शामराव ढमढेरे असे आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. जुगार खेळताना चार जणांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या गुन्ह्यात न्यायालयाने त्या चार जणांना प्रत्येकी २०० रुपये दंडाची शिक्षा देऊन सोडून दिले होते.
या चार जणांच्या जुगाराच्या गुन्ह्यात केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेताना रमेश ढमढेरे याला रंगेहाथ पकडले होते.
तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू थानसिंग चव्हाण यांनी विशेष न्यायालयात रमेश ढमढेरे याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम ७ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास) आणि कलम १३(१)(ड) सह १३(२) अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलीस हवालदार संतोष डोके यांनी सहाय्य केले.
