माजी नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात वाद : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असताना निवेदन देण्यासाठी आत शिरल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक आयुक्त अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अॅड. किशोर शिंदे, प्रशांत मते, नरेंद्र तांबोळी, अविनाश जाधव, महेश लाड आणि अन्य १० ते १२ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रमुख कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे बैठक घेत होते. ‘आयुक्तांच्या बंगल्यातील २० लाखांचे साहित्य गायब’ या प्रकरणी मनसेला निवेदन द्यायचे होते. यासाठी अॅड. किशोर शिंदे अचानक बैठकीत शिरले.
त्यावेळी आयुक्तांनी त्यांना विचारले, “तुमचे काय काम आहे?” यावर शिंदे म्हणाले, “मी माजी नगरसेवक आहे. चार वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे.” आयुक्तांनी पुन्हा विचारले, “तरी तुमचे नेमके काम काय आहे?” या प्रश्नावर वादविवाद सुरू झाला.
यानंतर आयुक्तांनी “आप बाहर निकल जाओ,” असे हिंदीत सांगितल्यावर शिंदे यांनी त्यावर आक्षेप घेत, “तुम्ही मराठीत बोला, तुम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढीन,” असे उत्तर दिले. त्यावर संतप्त आयुक्तांनीही, “मी घरात घुसून मारेन,” असे प्रत्युत्तर दिले.
यातून वाद अधिकच चिघळला. मनसे कार्यकर्त्यांनी बैठकीतच ठिय्या दिला. घटनेची माहिती मिळताच मनसेचे अनेक कार्यकर्ते महापालिकेत जमले. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत कोणालाही महापालिकेत प्रवेश दिला नाही.
नंतर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी महापालिकेच्या बाहेर काढले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली असून, गुन्हा नोंद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी दिली.
