मंत्रा इनसिग्निया प्रकल्पातील प्रकार : संचालक रोहित गुप्ता, विशाल गुप्ता आणि सिद्धार्थ जैन यांच्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडिलांच्या कंपनीचे बनावट लेटरहेड तयार करून खोटे पत्र बनवून ३३ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रा इनसिग्निया या प्रकल्पाचे संचालक रोहित घनश्याम गुप्ता, विशाल नंदलाल गुप्ता आणि सिद्धार्थ जैन यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी युगांक सुभाष कदम (वय ३४, रा. जंगली महाराज सोसायटी, सेनापती बापट रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. ही फसवणूक २७ जून २०१९ ते ८ डिसेंबर २०२३ दरम्यान मुंढव्यातील केशवनगर येथे घडली.
फिर्यादी यांचे वडील सुभाष कदम ‘सुभाष कदम अँड असोसिएट्स’ या नावाने रिअल इस्टेट व्यवसाय करत होते. त्यांनी केशवनगरमधील ७९ गुंठे जमीन विकसनासाठी सुरुवातीला ‘शिवम बिल्डकॉन’ला दिली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ‘मंत्रा प्रॉपर्टीज अॅन्ड डेव्हलपर्स’ यांच्याकडे हा प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय झाला.
त्या करारानुसार फिर्यादींना २९,५०० स्क्वेअर फुट बांधकाम मिळणार होते. त्यावेळी दर ४१२५ रुपये प्रति स्क्वेअर फुट असा ठरला होता. शासनाच्या नवीन आदेशांनुसार एफएसआय वाढल्यास त्यातील ४० टक्के वाढीव बांधकाम देण्याची अटही करारात होती.
दरम्यान, हा प्रकल्प पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातून पीएमसीकडे गेला आणि प्रकल्पासाठी वाढीव एफएसआय मिळाला. मूळतः १५,३२० चौरस मीटरला परवानगी होती, ती वाढून ५३,४९९ चौरस मीटर झाली. त्यानुसार वाढीव ६९,३९५ स्क्वेअर फुट जागा कदम यांना मिळणे अपेक्षित होते.
ही जागा न देता, मंत्रा इनसिग्नियाचे संचालक विशाल गुप्ता, रोहित गुप्ता आणि प्रवर्तक सिद्धार्थ जैन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता स्वतः चलन भरून, बाह्य टीडीआर वापरून बांधकाम करून वाढीव बांधकाम जागेपासून कदम यांना वंचित ठेवलं.
इतकंच नव्हे, तर सुरुवातीच्या ११,८५२ स्क्वेअर फुट जागेसाठी ४ कोटी ८८ लाख ८९ हजार ५०० रुपये थकीत असताना, त्यांनी कदम यांच्या वडिलांच्या कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून एक खोटं पत्र तयार केलं. त्या पत्रात १०,००० स्क्वेअर फुट जागेसाठी २,३०० रुपये प्रति स्क्वेअर फुट या दराने रक्कम स्वीकारण्यास तयार असल्याचं नमूद केलं.
हे सर्व करून आरोपींनी एकूण ३३ कोटी ५१ लाख ४३ हजार ८७५ रुपयांची फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.
