लॉ कॉलेज रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे.
राजू वामन खुडे (वय ४०, रा. प्रमोद महालेनगर, दीप बंगला चौक, शिवाजीनगर) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ६१ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकवरून परत येत होत्या.
लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या घराजवळील मंजुरंजन इमारतीच्या गेटजवळ पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता.
या गंभीर घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून समांतरपणे सुरु होता. शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचे अंधुक स्वरूपातले फुटेज मिळाले. ते सर्व खबऱ्यांना पाठवण्यात आले.
पोलीस अंमलदार मयुर भोसले आणि अमित जमदाडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, त्या फुटेजमधील व्यक्तीसारखा एक व्यक्ती दीप बंगला चौकात उभा आहे. त्यांनी तात्काळ खातरजमा करून शोध घेतला आणि राजू खुडे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक पोलीस फौजदार राहुल मखरे, विनोद शिंदे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे यांनी केली.
