साडेसतरा नळी येथे खंडणीसाठी गुंडांनी तोडफोड करून केले पावणे दोन लाखांचे नुकसान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : साडेसतरा नळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान दुचाकीवरून येऊन लोखंडी हत्यारांनी दुकानांची व गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या टोळक्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. दुकानदार व लोकांवर दहशत बसावी, तसेच त्यांनी खंडणी द्यावी, यासाठी सहा जणांच्या टोळक्याने दुकानातील साहित्य व गाड्यांची तोडफोड करून पावणे दोन लाखांचे नुकसान केले.
श्रेयस विकास आलेकर (वय २०, रा. हडपसर) आणि रोहित संदीप खाडे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत तेजाराम कृष्णाराम देवाशी (वय ४५, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांचे साडेसतरा नळी चौकात ‘ममता स्वीट्स’ नावाने मिठाईचे दुकान आहे. ४ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सहा जण हातात शस्त्रे घेऊन धावत त्यांच्या दुकानात आले. त्यांनी दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
तेव्हा त्यांनी, “काय झाले?” असे विचारल्यावर, “आम्ही इथले भाई आहोत, कोणी बाहेर आले तर मारून टाकीन,” अशी धमकी देत त्यांनी दुकानातील साहित्य फोडले व ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ओरडत गेले.
त्यांनी मिठाईचे ४ काउंटर, फ्रीज, बाहेरील काउंटरची काच फोडून १ लाख ७ हजार रुपयांचे नुकसान केले. वैभवलक्ष्मी क्रिएशन कपड्याच्या दुकानाची काच, बारामती अॅग्रो चिकन सेंटरच्या काउंटरची काच फोडली.
तसेच २ एटीका, मारुती वॅगनआर, रिक्षा, आय-२०, टिएगो गाड्यांची तोडफोड करून अंदाजे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.
पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्यात आली. गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे, अहिल्यानगर बस स्टँड भागातून श्रेयस आलेकर, रोहित खाडे व त्यांचे चार अल्पवयीन साथीदार ताब्यात घेण्यात आले. गुन्हा करताना वापरलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दुकानदारांनी खंडणी द्यावी व दहशत निर्माण करावी, म्हणून त्यांनी ही तोडफोड केल्याचे चौकशीत सांगितले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापूराव लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रवीकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी केली आहे.
