स्वातंत्र्याची जपणूक, सामाजिक व राष्ट्रसेवेत आदर्शवत योगदान द्यावे : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाची जाणीव ठेवून सामाजिक व राष्ट्राच्या सेवेत आपण योगदान द्यायला हवे. ‘सूर्यदत्त’ संस्थेमध्ये हा संस्कार व शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. सामाजिक बांधिलकी व राष्ट्राच्या सेवेसाठी सूर्यदत्त संस्था व आमचे विद्यार्थी नेहमीच तातार असतो,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
देशभक्तीच्या रंगांनी नटलेला आणि उत्साहाच्या लहरींनी गजबजलेला ७९ वा स्वातंत्र्यदिन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवशक्ती भवनच्या संचालक बीके लक्ष्मी दिदी, सामाजिक कार्यकर्ते कृष्णन सुब्रमणी, निवृत्त फ्लाईंग ऑफिसर रामनरेश दुबे यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, ऑपरेशन्स व रिलेशन्स मॅनेजर स्वप्नाली कोगजे, डॉ. सारिका झांबड, प्रा. मोनिका शेरावत आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत झाले. तिरंग्याच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गीते आणि सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमून देशप्रेमाची लहर निर्माण झाली.
बीके लक्ष्मी दीदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मन:शांती आणि बौद्धिक संतुलनानेच माणूस खऱ्या अर्थाने पुढे जातो. शांत मन आणि स्वच्छ विचार हीच प्रगतीची खरी किल्ली आहे. जीवनातील मानसिक स्वास्थ्य, आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यावर भर दिला पाहिजे.”
कृष्णन सुब्रमणी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना म्हटले की, “सुव्यवस्थित जीवनशैली आणि स्वच्छतेशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने प्रगती केली असे म्हणता येणार नाही. शिक्षणाबरोबरच सुजाण आणि सजग नागरिक होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.” त्यांच्या या शब्दांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. रामनरेश दुबे यांनी आपल्या भाषणात शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
“आयुष्यात पुढे जायचे असल्यास शिस्त ही आवश्यकच आहे. शिस्त आणि आपले लक्ष या दोन्हीची सांगड घालूनच उज्ज्वल भविष्य घडवता येते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकता जोपासण्याचे आवाहन केले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सूर्यदत्तचे विद्यार्थी ही आमची खरी ताकद आहेत. त्यांच्यामध्ये देशभक्ती, शिस्त, स्वच्छता आणि सकारात्मक विचारांची जपणूक झाली तर ते नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी ठरतील.
शिक्षणाबरोबरच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी हीच आमच्या शिक्षणपद्धतीची ओळख आहे.” कार्यक्रमाचे संयोजन स्वप्नाली कोगजे यांनी केले. डॉ. सारिका झांबड, प्रा. मोनिका शेरावत यांचे सहकार्य लाभले.
या सोहळ्याने देशभक्तीच्या उन्मेषात, प्रेरणादायी विचारांत आणि सांस्कृतिक सादरीकरणांत रंग भरले. उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण झाली. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यदिन हा केवळ आनंदाचा दिवस नसून, तो आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा पवित्र क्षण आहे. सूर्यदत्तचे विद्यार्थी केवळ शिक्षणातच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेतही आदर्श निर्माण करतील, हीच खरी स्वातंत्र्याची जपणूक आहे. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक व अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
