होलमार्क असलेले बनावट दागिने : वडगाव शेरी, हडपसरमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : होलमार्क असेल तर त्याच्या खरेपणाची खात्री असते. असेच होलमार्क असलेले बनावट दागिने गहाण ठेवून दोघांनी एका सराफाला सव्वा दोन लाख रुपयांना गंडविले, तर दुसऱ्या सराफाची चौघा जणांनी २ लाख ९८ हजारांची फसवणूक केली.
याबाबत नरपतसिंग हेमसिंग देवरा (वय ४०, रा. चिंतामणी नगर, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अजय पवार व अक्षय धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरपतसिंग देवरा यांचे चिंतामणी नगर येथे हनुमान ज्वेलर्स नावाने सोने-चांदीचे दुकान आहे. अजय पवार असे नाव सांगणारा तरुण १ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या दुकानात आला होता.
त्याने गावाकडे तात्काळ रकमेची आवश्यकता असल्याचे सांगून, “माझ्याकडील सोन्याची चैन घ्या आणि मला १ लाख रुपये द्या. तीन महिन्यांनी पैसे आल्यावर चैन सोडवून घेतो,” असे सांगितले.
१७ ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या चैनची पावती मागितल्यावर, ती कल्याणमधील सुंकेकर ज्वेलर्सकडून खरेदी केलेली असल्याचे सांगितले.
तसेच २५ ऑगस्ट २०१९ रोजी खरेदी केल्याची पावती दिली. चैनवर २२ कॅरेट ९१.६ असे होलमार्क होते. त्यामुळे देवरा यांनी सोन्याची चैन ठेवून घेतली आणि त्याला १ लाख रुपये दिले. यानंतर २४ एप्रिल २०२५ रोजी अजय पवार व त्याचा मित्र अक्षय धुमाळ हे दोघे आले.
त्यांनी पैशांची गरज असल्याचे सांगून, १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट ठेवून २ लाख रुपयांची मागणी केली. परंतु ब्रेसलेटचे वजन पाहून देवरा यांनी “सव्वा लाख रुपये देऊ शकतो,” असे सांगितले. त्यावर त्यांनी ब्रेसलेट ठेवून सव्वा लाख रुपये घेतले.
काही दिवसांनी देवरा यांनी त्यांना गहाण ठेवलेले सोने परत कधी घेऊन जाणार, असे विचारले असता, “आज येतो, उद्या येतो,” असे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी दागिने मशीनद्वारे तपासले असता ते बनावट असल्याचे समजले.
याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय हंचाटे तपास करीत आहेत. दुसऱ्या प्रकरणात कैलास मांगितलाल कुमावत (वय ४३, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुमावत यांचे वडगाव शेरीतील गणेशनगर येथे सॉवलिया ज्वेलर्स अँड सराफ हे दुकान आहे.
१३ जुलै रोजी त्यांच्या दुकानात दोन जण आले. त्यांनी सोन्याची चैन विकण्याच्या बहाण्याने येऊन बनावट चैन विकून त्याबदल्यात ८५ हजार रुपये घेतले. त्यानंतर १४ जुलै रोजी आणखी दोन जण आले. त्यांनी सोन्याचे ब्रेसलेट विकण्याच्या बहाण्याने दुकानातून १ लाख १३ हजार रुपयांची सोन्याची चैन खरेदी केली.
त्या बदल्यात चार-पाच दिवसांत पैसे परत करतो, असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र, पैसे परत न करता खोटे सोन्याचे ब्रेसलेट देऊन फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राऊत तपास करीत आहेत.















