माजी शिक्षकांच्या आठवणींनी डोळ्यात आले अश्रू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विधी क्षेत्रामध्ये राज्यभर नावलौकिक मिळवलेले सुप्रसिद्ध वकील ॲड. सचिन झालटे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत झेंडा वंदना कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. झालटे यांनी “मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड बाळगू नका” असे आवाहन केले. देशाच्या कानाकोपऱ्यात सुलाखे शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील विविध उच्च न्यायालयात अस्खलित इंग्रजीत युक्तिवाद करताना शाळेतील इंग्रजी शिक्षक ह. वा. कुलकर्णी, पी. व्ही. कुलकर्णी, परितकर सर यांनी घातलेल्या भक्कम पायाची आठवण त्यांनी कृतज्ञतेने केली.
त्यांनी पुढे सांगितले की, “इंग्रजीचे अवडंबर न माजवता मातृभाषेतून दिलेली शिकवण विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करते.” तसेच आबा महाजन, मन गोलीकर, सु. का. पाटील या शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेमुळेच मी आज वकील झालो आहे, असेही त्यांनी नमूद केले. शाळेतील रमण मंडळ, तांत्रिक विभाग, क्रीडा विभाग यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
“आज शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्र क्रिकेट संघात झळकत आहेत, परंतु त्यामागे मु. मा. देशमुख सर व बोंबलट सर यांचे मोलाचे योगदान आहे,” असे त्यांनी सांगितले. शाळेतील गमतीजमती आणि त्यांच्या काळातील शिक्षेचे प्रकारही त्यांनी सांगितले.
“कडक शिस्तप्रिय शिक्षकच देश घडवू शकतात. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना माफक प्रमाणात शिक्षा देण्याचा अधिकार असायलाच हवा. अन्यथा पुढची पिढी शिस्तप्रिय होणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून, विद्यार्थी मोठे होऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. हयात नसलेल्या शिक्षकांच्या आठवणी काढताना त्यांचा कंठ दाटून आला.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक हिरोळीकर सर, प्रमुख पाहुणे माजी नायब तहसीलदार वायकुळे साहेब, शिक्षकवृंद, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कदंब वृक्षाची लागवड करून वृक्षारोपणही करण्यात आले.
भाषणाच्या शेवटी ॲड. झालटे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रभर विधी व्याख्यानमालेच्या निमित्ताने माझे अनेक ठिकाणी सत्कार झाले, मात्र आजचा शाळेतला सत्कार माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अनमोल आहे.” यावेळी त्यांनी शाळेला ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
