बनावट पावत्या व आधार कार्ड वापरून घालत होते गंडा : युनिट ६ ची मोठी कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : होलमार्कची चिन्हे असलेली बनावट सोनसाखळी व ब्रेसलेट हे खरे असल्याचे भासवून सराफांकडे गहाण ठेवून पैसे उकळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
राहुल संजय गोरे (वय ३०, रा. ओम अपार्टमेंट, मोहननगर, धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८) व ओम सुंदर खरात (वय २३, दोघे रा. गोगावले बिल्डिंग, वडगाव बुद्रुक). अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या तिघांनी चंदननगर, पर्वती, काळेपडळ आणि आंबेगाव येथील चार सराफांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये रोख, १ लाखाचे मोबाईल, तर ४ लाखांचे बनावट होलमार्क दागिने असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत असून, त्यांनी पुण्यातील किमान १५ ते १६ सराफांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१८ ऑगस्ट रोजी युनिट ६ चे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व बाळासाहेब सकटे हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाघोलीतील खांदवेनगर परिसरात काही जण बनावट दागिने गहाण ठेवून सराफांची फसवणूक करत आहेत.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांना पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकट, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
ही टोळी मुंबईतून तांब्याच्या वस्तूंवर सोन्याचा मुलामा दिलेल्या साखळ्या व ब्रेसलेट आणत असे. हे दागिने त्यांना २८०० रुपये तोळा या भावाने मुंबईतील एका टोळीकडून मिळत. या बनावट दागिन्यांवर लेझरने होलमार्कची खोटी चिन्हे उमटवली जात. त्यानंतर त्यानुसार बनावट जुन्या पावत्या तयार करून सराफांची फसवणूक केली जाई.
दागिने गहाण ठेवताना आरोपी आधारकार्ड, पावती व होलमार्क दाखवत असल्याने सराफ त्यांच्या जाळ्यात अडकत. प्रत्येकी १ लाख ते सव्वा लाख रुपये मिळवत आरोपी काही दिवसांनी दागिने सोडवून नेऊ, असे सांगून गायब होत. छोट्या सराफांकडे सोन्याचे शुद्धतेचे मशीन नसल्याने फसवणूक उघड होत नसे. नंतर काही दिवसांनी दागिने तपासल्यावर ते बनावट असल्याचे समोर येई.
