जमीन मोजणीचा अहवाल सादर करण्यासाठी मागितली होती लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सामायिक जमिनीची मोजणी करून त्याचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून तो प्रस्ताव दौंड तहसीलदार यांना सादर करण्यासाठी तसेच तक्रारदाराला प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक आणि सहाय्यक सर्व्हेयर यांना रंगेहाथ पकडले.
परिरक्षण भूमापक वैशाली चंद्रकांत धसकटे (वय ४९, रा. केडगाव स्टेशन, दौंड) आणि सहायक सर्व्हेयर फय्याज दाऊद शेख (वय २७, रा. पानसरे वस्ती, दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाचा दावा दौंड दिवाणी न्यायालयात सुरू आहे.
त्या दाव्यामध्ये कोर्टाने तक्रारदारांच्या सामायिक जमिनीचा हिस्सा ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे वाटप करून घेण्याबाबत आदेश दिला होता. दौंड तहसीलदारांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांना तक्रारदारांच्या सामायिक जमिनीची मोजणी करून वाटप तक्ता सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे हे प्रकरण दौंड येथील भूमी अभिलेख उपअधीक्षकांकडे आले.
तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची मोजणी वैशाली धसकटे यांनी केली होती. या जमिनीच्या मोजणीचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून त्यावर उपअधीक्षकांची सही घेऊन तो प्रस्ताव दौंड तहसीलदार यांना सादर करण्यासाठी आणि तक्रारदाराला प्रत देण्यासाठी वैशाली धसकटे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्याची तक्रार तक्रारदाराने ४ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याअनुषंगाने ११ ऑगस्ट रोजी पडताळणी कारवाई केली असता, वैशाली धसकटे यांनी सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १४ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर २० ऑगस्ट रोजी सापळा कारवाईदरम्यान वैशाली धसकटे यांच्या सांगण्यावरून सहायक सर्व्हेयर फय्याज शेख यांनी तक्रारदाराकडून दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करीत आहेत.
