पदमावतीत गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कारवाई , ५ किलो गांजा जप्त : पोलीस दलात खळबळ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पुणे–सातारा रोडवरील पदमावती येथे रांका ज्वेलर्सच्या मागे विक्रीसाठी बाळगलेला ५ किलो २६० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजा व्यवसायात भागीदार असलेल्या नवनाथ कांतीराम शिंदे या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तात्काळ निलंबित केले.
शिंदे सध्या स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो सहकारनगर परिसरात वसुलीचे काम पाहत होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत व पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्याची मोहिम सुरू आहे.
अशा काळातच पोलीस अंमलदार गांजाच्या व्यवहारात भागीदार असल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक खरात, सहायक पोलीस फौजदार शेख, चालक अंमलदार जामगे व इतर कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना, पदमावती येथे प्रतिक आंत्वन पवार याच्या ताब्यातून विक्रीसाठी बाळगलेला गांजा मिळाला.
त्याला अटक करण्यात आली असून एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाले की, हा गांजा मालक सौरभ कट्टीमणी ऊर्फ पाटील, भागीदार सागर चव्हाण ऊर्फ डागा भाई, मॅनेजर अभिजित सावंत यांच्या मार्फत प्रतिक पवार व त्याचा साथीदार सॅण्डी ऊर्फ संदिप घोटे यांच्याकडे विक्रीसाठी पुरविला जात होता.
या सर्वांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवनाथ शिंदेची भागीदारी उघडकीस या कारवाईपूर्वी पोलिसांना गुप्त संदेश मिळाला होता की सातारा रोड परिसरात गांजा विक्रीचा मोठा धंदा सुरू असून, सौरभ कट्टीमणी व डोंग्या भाई यांना नवनाथ शिंदे मदत करत आहे.
शिंदे हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलेक्शनचे काम बघत असून, स्पा, पिठा, मटका क्लब आदी अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याची चर्चा होती. प्रतिक पवारच्या मोबाईलमध्ये नवनाथ शिंदेचा नंबर “एन.बी.” या नावाने सेव्ह आढळला.
चौकशीदरम्यान त्याने तो नवनाथ भाऊ यांचा नंबर असल्याचे सांगितले. तसेच तो सहकारनगर पोलीस ठाण्यातील वसुलीचे काम करतो व सौरभ कट्टीमणी याच्याकडून पैसे घेतो, असे त्याने कबूल केले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार अवैध धंदे बंद करण्याबाबत कडक सूचना दिल्या असतानाही नवनाथ शिंदे याने त्याकडे दुर्लक्ष केले.
त्याचे कृत्य हे शिस्तभंगाचे असून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारे असल्याने, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

















