बाणेर पोलिसांची ज्युपिटर हॉस्पिटलसमोर मध्यरात्री कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करून बाणेर पोलिसांनी ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
रवि विजय वर्मा (वय १९, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. भरतकुप, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश), कौशलेन्द्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. बरथवाल, भरतकुप, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार दत्ता संभाजी काळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा वाजता बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर करण्यात आली.
बाणेर पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून रात्री पेट्रोलिंग करत असताना बाणेरमधील ब्लूमिंगडेल्स सोसायटीसमोर दोघे जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून ३ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करीत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक संदेश माने, शैला पाथरे, सहाय्यक पोलीस फौजदार सपकाळ, पोलीस अंमलदार गायकवाड, आहेर, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे, खुडे, पाथरुट, बर्गे यांनी केली.















