692 किलो गांजा जप्त : तीन वाहने ताब्यात व एक आरोपी अटकेत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल 692 किलो 945 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹ 1,60,58,900/-) जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक ट्रक, एक टेम्पो व एक कार अशी तीन वाहने ताब्यात घेण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना गांजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगळगाव बार्शी रोडवर सापळा लावण्यात आला.
या वेळी कार (MH 14 EC 4536), टेम्पो (MH 14 EM 9833) व ट्रक (MH 43 Y 8947) ही वाहने आढळली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यावर कार व ट्रक चालक पसार झाले, मात्र टेम्पो चालकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याची ओळख अंकूश दशरथ बांगर (रा. भोयरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी झाली. चौकशीत त्याने वाहनांमध्ये गांजा असल्याचे कबूल केले.
पंचा समक्ष तपासणी केली असता वाहनांमधून एकूण 692 किलो 945 ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. 262/25 नुसार NDPS Act 1985 कलम 8(क), 20(ब), 11(क) अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली. दिनांक 22 ऑगस्ट रोजी त्यास मा. प्रथमवर्ग न्यायालय, बार्शी येथे हजर केले असता न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सहा. सरकारी अभियोक्ता श्री. कुलकर्णी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पो.उ.नि. बालाजी वळसने यांच्यासह पो.हे.कॉ. धनराज केकाण, पांढुरंग देशमुख, अभय उंदरे, अरुण डुकळे, तानाजी डाके, पो.ना. सागर शेंडगे, पो.कॉ. सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, राहूल बोंदर, उत्तरेश्वर जाधव, मंगेश बोधले, शैलेश शिंदे, ओमप्रकाश दासरे, शशिकांत लोकरे, धनराज फत्तेपुरे, अविनाश पवार, वैभव भांगे, रतन जाधव, राहूल उदार, सुनिल सरडे, रमेश माने, असलम पटेल, चालक ए.एस.आय. केशव माशाळ, चा.पो.कॉ. लक्ष्मण चिट्टलवाड व चा.पो.कॉ. वैभव माळी आदी सहभागी होते.
प्राथमिक तपासात ही टोळी आंतरराज्यीय असल्याचे समोर आले असून आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी तीन स्वतंत्र पोलीस पथके पुढील तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत.

 
			

















