इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल, पबचे परवाने रद्द करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाविद्यालयीन तरुण–तरुणींसाठी फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली दारूच्या पाट्या वाहणाऱ्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल व पबचालकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. असा प्रकार आढळल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील पी यो गार्डन पबमध्ये एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बेकायदा फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता मद्य पुरवले जात होते. त्यावेळी दारू प्यायलेल्या तरुण–तरुणींनी परिसरात गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने ही पार्टी बंद पाडली होती.
याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. काही बार, पबमध्ये उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना मद्यपान दिले जात आहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, जे नियमबाह्य आहे.
हॉटेल व पबचालकांनी प्रवेश देण्यापूर्वी डिजी लॉकर कागदपत्रांद्वारे ग्राहकांचे वय तपासणे बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना अशा बेकायदा कार्यक्रमात सहभागी होण्यापासून परावृत्त करण्यासाठी महाविद्यालयांनी त्यांना सतर्क करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जर कोणत्याही इव्हेंट कंपनीने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला, तर त्यांच्यावरही फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत पोलीस अंमलदार अमित बधे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून पोलिसांनी निखिल प्रकाश सुर्वे (४२, रा. बोरीवली ईस्ट, मुंबई), रोहन रमेश सावंत (३९, रा. खराडी), उपेंद्र संजय जुवेकर (२६, रा. सोमवार पेठ), सुदर्शन फटाके (२२, रा. पुणे) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. ही पार्टी २३ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयोजकांनी कोणतीही परवानगी न घेता विना परवाना फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी १०० ते १५० विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांनी पूर्वसूचना देऊनही आयोजकांनी कोणतीही माहिती किंवा परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित केला.
मनसेला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले. त्यानंतर विभागाचे अधिकारी व मनसे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
















