चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याचा परिणाम : मांजरीतून एकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय असूनही, प्रमाणाबाहेर नफ्याच्या आमिषाला भुलून चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याने एका व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा बसला. या प्रकरणात पिंपरी सायबर पोलिसांनी मांजरीतून एका आरोपीस अटक केली आहे.
याबाबत अनिलकुमार दिवाकरन (वय ५४, रा. म्हाळुंगे गाव) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दीपक नायर, राजीव भाटीया, गौरव मिश्रा यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला असून, संतोष सदाशिव रुपनर (वय ४७, रा. मांजरी बुद्रुक) याला अटक केली आहे.
हा प्रकार ८ जुलै २०२५ ते १३ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे. फिर्यादी हे ऑनलाईन शेअर ट्रेडिंग व्यवसाय करतात. त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून, वेगवेगळ्या लिंक पाठवून “४० ते ५० टक्के नफा मिळेल” असे आमिष दाखवण्यात आले.
त्यासाठी एक अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्या अॅपवरून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. अॅपमध्ये खोटा नफा दाखवण्यात आला.
परंतु तो नफा काढण्यासाठी पुन्हा विविध करांच्या (टॅक्स) नावाखाली आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. अशा रीतीने एकूण २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
तपासादरम्यान फिर्यादींनी भरलेले सुमारे १ कोटी रुपये हे संतोष रुपनर याच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट झाले.
त्याने “खासगी व्यवसाय” असल्याचे दाखवत खाते वापरण्यास दिले होते. त्यामुळेच ते खाते फसवणुकीसाठी वापरले गेले असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.
