महिलांबरोबरच पुरुषांनाही चोरट्यांनी बनवले लक्ष्य
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी वारंवार “दागिने सांभाळा, मोबाईल जपा” असा इशारा दिल्यानंतरही चोरट्यांनी थैमान घातले. रविवारी रात्रीपर्यंत मिरवणुकीदरम्यान तब्बल १३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत.
त्यापैकी केवळ मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतच ७ ठिकाणी तीन लाखांचे दागिने चोरले गेले. महिलांबरोबरच पुरुषांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसुत्रे हिसकावली.
विशेषत: बेलबाग चौक ते गुरुजी तालीम या परिसरात सर्वाधिक घटना घडल्या. मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यावर चोरट्यांनी डोळा ठेवला होता. शनिवारी सकाळी ताथवडे येथील ५० वर्षीय नागरिकाची सेवासदन चौकात ८० हजारांची सोन्याची चैन लंपास झाली.
त्याच दिवशी दुपारी बिबवेवाडी येथील ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १० हजारांचे मंगळसूत्र गुरुजी तालीमजवळ चोरीस गेले. कर्वेनगरमधील ३० वर्षीय तरुणीची ८० हजारांची चैन, तर वारजे येथील ३९ वर्षीय महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्रही गर्दीतून चोरट्यांनी हिसकावले.
याशिवाय, हडपसरमधील ७१ वर्षीय नागरिकाची १२ हजारांची सोनसाखळी बेलबाग चौकात, तर कोथरुड येथील ७६ वर्षीय नागरिकाची १५ हजारांची चैन गुरुजी तालीम परिसरातून चोरट्यांनी लांबवली. या सर्व प्रकरणांची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दागिन्यांच्या किमतीत तफावत
या १३ घटनांमध्ये चोरीस गेलेल्या दागिन्यांची प्रत्यक्ष बाजारमूल्य किंमत याहून खूप जास्त असल्याचे समोर आले आहे. नागरिक दागिने खरेदी करताना पावतीवरील किंमत दाखवतात, त्यामुळे गुन्हा नोंदवताना त्या वेळीचा सोन्याचा दर ग्राह्य धरला जातो. प्रत्यक्षात सध्याचा सोन्याचा भाव पटीने वाढल्याने चोरट्यांचा गंडा आणखी मोठा ठरतो.
