आयुष कोमकर खून प्रकरण : बुलढाणा येथून केले जेरबंद, आतापर्यंत ८ जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या आरोपातून आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकर याच्यासह ४ जणांना बुलढाणा येथून जेरबंद करण्यात आले. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ८ जणांना अटक केली आहे.
सूर्यकांत उर्फ बंडु राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२, रा. नाना पेठ), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०, रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीम जवळ), तुषार निलंजय वाडेकर (वय २६, रा. नाना पेठ) अशी बुलढाणा येथून अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्याबरोबरच अमन युसुफ पठाण उर्फ खान (रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) आणि सुजल राहुल मेरगु (वय २३, रा. नाना पेठ) यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०, रा. नाना पेठ), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, रा. नाना पेठ), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९, रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीमजवळ), शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१, रा. नाना पेठ) हे पाच जण फरार आहेत.
अमित प्रकाश पाटोळे (वय १९, रा. नाना पेठ) आणि यश सिद्धेश्वर पाटील (रा. नाना पेठ) या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यापूर्वी अटक केलेले यश पाटील आणि अमित पाटोळे तसेच सुजल मेरगु आणि अमन पठाण या चौघांनी घटनास्थळी लक्ष्मी कॉम्प्लेक्सची रेकी केली होती. यश पाटील आणि अमन पठाण यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला असून अन्य दोघे जण मोटारसायकलवर बसले होते.
गोळीबार केल्यानंतर दोघेही त्यांच्या बाईकवर बसून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आंबेगाव पठार येथील सोमनाथ गायकवाड यांच्या कुटुंबियांना आंदेकर टोळीने टार्गेट केले होते. तो प्रयत्न पोलिसांनी वेळीच हाणून पाडल्यानंतर त्यांनी मध्यवस्तीतील कोमकर कुटुंबातील तरुणाला टार्गेट बनविले.
आयुष कोमकर हा टोळीप्रमुख बंडु आंदेकर याचा नातू आहे. आयुष हा एमआयटीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. आंबेगाव पठार येथील आंदेकर टोळीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पोलिसांनी बंडु आंदेकर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
त्यापूर्वीच तो परराज्यात पळून गेला होता. ही घटना घडली तेव्हा तो कोची येथे असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखा आणि समर्थ पोलीस ही टोळीचा शोध घेत होती. तो बुलढाणा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे पथक काल तिकडे रवाना झाले होते.
त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात महामार्गावर बंडु आंदेकर याच्यासह चार जणांना पकडले. त्यांना मंगळवारी पहाटे पुण्यात आणले आहे.
