“डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन”
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : जिजामाता कन्या प्रशालेत रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने “सशक्त मन – निरोगी तन” किशोरवयीन मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी डॉ. मंजुषा कुलकर्णी मॅडम प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर. बी. पाटील यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी नवनाथ गुल्हाने सर यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थिनींना दिली.
तर रोटरी क्लब ऑफ बार्शीचे अध्यक्ष संजय हिंगमिरे यांनी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती विद्यार्थिनींना दिली. या प्रसंगी रो. मल्लिकार्जुन धारूरकर व रुपाली गुल्हाने मॅडम उपस्थित होते.
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक आरोग्य टिकविण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. समाधान, समतोल, संयम आणि सभ्यता या चार सूत्रांचा अवलंब केल्यास आयुष्य आनंदी कसे बनते याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत शंका निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका खैरनार मॅडम यांनी केले तर रोटरी क्लब ऑफ बार्शीच्या प्रकल्प प्रमुख डॉ. क्षमा बकाल यांनी आभार मानले.
