ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल ३२ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव येथे राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. महिलेच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाल्याचे आणि त्या नावाचा गैरवापर करून बँकेत खाते उघडण्यात आल्याचे चोरट्यांनी सांगितले.
या खात्यातून काळ्या पैशांचे व्यवहार झाले असून, ईडीकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई होणार असल्याची भीती पीडितेला दाखवण्यात आली. यानंतर खात्याची पडताळणी करावी लागेल, असे सांगून चोरट्यांनी महिलेची गोपनीय माहिती मिळवली.
“कारवाई टाळायची असेल, तर तातडीने पैसे जमा करावे लागतील”, असे सांगून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास भाग पाडले. दरम्यान, महिलेने चार दिवसांच्या कालावधीत सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात ३२ लाख ६ हजार रुपये जमा केले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम करत आहेत.
