पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकाने व्यसनाधीन मित्रांना भेटण्यास नकार दिल्याने हल्ला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय युवकावर त्याच्या व्यसनाधीन मित्रांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत उत्तमनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साईनिवास, कोंढवे-धावडे, एनडीए रोड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या दोन्ही हातांना खोलवर जखमा झाल्या असून शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.
घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता उत्तमनगरमधील आर. आर. वाईन्सजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला असून सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे. आरोपी करणसिंह गचंड (रा. मनिषा थिएटर, उत्तमनगर) व त्याचा भाऊ हे प्रथमेशचे मित्र आहेत.
करणसिंह याच्यावर आधीपासूनच मारहाणीचा गुन्हा दाखल असून तो व त्याचे साथीदार व्यसनाच्या नादाला लागलेले आहेत. प्रथमेशला त्यांच्या सहवासामुळे व्यसन लागू शकते व गुन्ह्यात अडकून पोलीस भरतीस अडथळा येईल, या भीतीमुळे त्याने काही दिवसांपासून त्यांना टाळणे सुरू केले होते. त्यामुळे आरोपी त्याच्यावर रागावले होते.
११ सप्टेंबर रोजी आरोपींनी प्रथमेशला फोन करून “गैरसमज मिटवायचे आहेत” या बहाण्याने आर. आर. वाईन्सजवळ बोलावले. रात्री आठच्या सुमारास प्रथमेश तेथे पोहोचला असता करणसिंह, त्याचा भाऊ व इतर साथीदारांनी त्याला दमदाटी करून “तू आमच्यात बसत नाहीस, मोठा माणूस झाला आहेस” असे बोलत त्याच्यावर हल्ला चढवला.
करन्सिंहने प्रथमेशची कॉलर पकडून “याला सोडायचे नाही, खल्लास करायचे” असे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याच्या भावाने लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रथमेशने हात आडवे घालून बचाव केला असता त्याच्या दोन्ही हातांवर तीन-चार गंभीर वार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला.
यानंतर आरोपींनी शस्त्र हवेत फिरवून “आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही” अशी दहशत निर्माण केली. जखमी अवस्थेत नातेवाईकांनी प्रथमेशला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो उपचाराधीन आहे.
या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह गचंडला अटक केली आहे. तिघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत.
