महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरातील अनेक रस्त्यांवर जड वाहनांमुळे वारंवार अपघात घडत होते. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने गर्दीच्या वेळेत (पीक अवर्स) जड वाहनांना बंदी घातली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दुपारच्या वेळी सुट देण्यात आली आहे.
मार्केटयार्ड परिसरातून अन्नधान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची ने-आण जड वाहनांमार्फत केली जाते. या वाहनांना सोमवार ते शुक्रवार दुपारी १२ ते ४ या वेळेत मार्केटयार्ड चौक – कात्रज चौक – सातारा रोडमार्गे पुणे शहराच्या बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी जारी केला आहे.
अलीकडेच गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर परिसरातील काही रस्त्यांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती.
तथापि, मार्केटयार्डमध्ये आलेल्या वाहनांना पुण्याबाहेर जाण्यासाठी दिवसा मार्ग उपलब्ध नसल्याने, नागरिकांच्या सोयीसाठी व जीवनावश्यक वस्तूंच्या अखंड पुरवठ्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
