पुणे शहरात पूराचा धोका : थेऊरमधील वस्तीत ओढ्याचे पाणी शिरले, ७० जणांची सुटका
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. परिणामी सोमवारी सकाळपासून खडकवासला धरणातून १४ हजार ५४७ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत आहे. यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला असून पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास आणखी पाणी सोडावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
हवेली तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कदमवाक वस्ती येथे सकाळी साडेआठपर्यंत तब्बल १८० मिमी पावसाची नोंद झाली. तर थेऊर येथे पहाटे तीनच्या सुमारास ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वस्तीत घुसले. या घटनेत सुमारे १०० जण पाण्यात अडकले होते.
पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रश्शीच्या सहाय्याने या लोकांची सुटका केली. थेऊर येथील ओढ्यालगत सरंक्षक भिंत बांधल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडखळला आणि पाणी थेट वस्तीत शिरले. नंतर जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून मार्ग खुला करण्यात आल्यानंतर पाणी ओसरले.
उजनी धरणातून १ लाख क्युसेक विसर्ग
हवेली तालुक्यातील प्रचंड पावसाबरोबरच उजनी धरण परिसरात ९५ मिमी पावसाची नोंद झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आले. परिणामी सोमवारी सकाळी ९ वाजता उजनी धरणातून तब्बल १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला. तसेच वीर धरणातून १७ हजार १११ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे पंढरपूर परिसरात महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसाचे आकडे (मिमी)
हवेली – १८०
शेटफळ – १५६
उजनी – ९५
दौंड – ८५
यवत – ८२
चिंचवड – ८२
इंदापूर – ६४
शिवाजीनगर – ६०
पाषाण – ६०
डुडुळगाव – ५७
हडपसर – ५६
बारामती – ५२
मगरपट्टा – ४८
