वाघोली पोलिसांची धडक कारवाई : तिघांना अटक, १२ लाखांचे ४५ मोबाईल हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल पाठवून देशभरातील अनेकांचे क्रेडिट कार्ड हॅक करून ऑनलाईन मोबाईल खरेदी करणारे रॅकेट वाघोली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १२ लाख रुपये किमतीचे ४५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अस्लम मोफिद खान (वय २२, रा. भिवूर, ता. चैनपूर, जि. कैमुर, बिहार; सध्या रा. काळुबाईनगर, वाघोली), आदिब रिझवान खान (वय २१, रा. नौसारी, वेरावळ रोड, सुरत), फरहान इब्राहिम ऊनवाला (वय २५, रा. मेमन अपार्टमेंट, कलमगल्ला चौक, बाजार, सुरत, गुजरात) भारतीय सेनादलातील करिमुल खुसममुद अली इस्लाम (वय ३२, रा. वाघोली) यांच्या क्रेडिट कार्डवरून १ लाख ६ हजार ८८५ रुपयांचे मोबाईल फ्लिपकार्टवरून खरेदी करून फसवणूक करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास वाघोली पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने सुरू केला. तपासादरम्यान या मोबाईलची डिलिव्हरी वाघोली केसनंद रोडवरील प्रिन्स मेडिकल येथे झाल्याचे उघड झाले. फ्लिपकार्टकडून मोबाईल रिसिव्ह करणाऱ्याचा फोटो पोलिसांना मिळाला. त्यावरून वाघोली, केसनंद, बकोरी, खराडी आणि चंदननगर परिसरात शोध घेतल्यावर तो तरुण अस्लम खान असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी छापा घालून अस्लम खान आणि आदिब खान यांना अटक केली.
चौकशीत उघड झाले की, हे दोघे क्रेडिट कार्ड हॅक करून फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी करत. त्यानंतर आदिब खान सुरत येथे विमानाने जाऊन हे मोबाईल फरहान ऊनवाला याला विक्री करत असे. या पद्धतीने त्यांनी अनेकांना फसवले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १२ लाख रुपयांचे ४५ मोबाईल जप्त केले आहेत.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, किरण अब्दागिरे, विष्णु सरवदे, सतिश बिरादार आणि वृंदाविनी चव्हाण यांनी ही कारवाई केली.
