महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शंकरराव पाटील स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांचा भव्य पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शिंदे सर होते. पर्यवेक्षक श्री. आर. डी. सोळंके सर यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. विशेषतः मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, JEE, NEET, MHT-CET यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तसेच नाममात्र शुल्कात सर्व सोयींनी सुसज्ज मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा दिली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. शिंदे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. पालकांनीही आपल्या मनोगतातून बदलत्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार व मूल्यशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. चव्हाण मॅडम यांनी मानले.
