कोथरुडमध्ये आणखी एका तरुणावर कोयत्याने वार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर परिसरात दुचाकीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून घायवळ टोळीतील गुंडांनी मध्यरात्री गोळीबार केला.
या घटनेत प्रकाश धुमाळ (वय ३६, रा. डांगे चौक) जखमी झाला असून, त्याच टोळीने काही अंतरावर दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला देखील गंभीर जखमी केले. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
प्रकाश धुमाळ आणि त्याचे सहकारी खेड शिवापूरहून परत येत असताना, ते कोथरुड येथील मुठेश्वर मंदिराजवळील एका मित्राला सोडून गप्पा मारत उभे होते. यावेळी निलेश घायवळ टोळीतील गुंड दोन दुचाकींवरून तेथे आले. त्यांनी साईड न दिल्याच्या कारणावरून वाद घालत मयूर कुंबरे याने पिस्तूलातून गोळीबार केला.
ही गोळी प्रकाश धुमाळ यांच्या मांडीला लागली. धुमाळ यांनी भीतीने तेथेच गच्चीत लपून बसत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
यानंतर हेच गुंड पुढे गेले असता वैभव साठे (रा. सागर कॉलनी, कोथरुड) याला भेटले. “आम्ही इथले भाई आहोत” असे सांगत त्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केला. साठे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी मयूर कुंबरे, गणेश राऊत, मयंक व्यास, रोहित आखाडे आणि आनंद चांडेलकर या पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
