घरबसल्या उद्योग पुरविण्याच्या आमिषाने ९० महिलांकडून साडे दोन लाखांची लूट
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ९० महिलांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला उद्योग वर्धिनी संस्थेचे संचालक सुनील नारायण शिराळकर व त्यांची पत्नी सविता सुनील शिराळकर (रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती) यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ५ जून २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत घडला. याबाबत जुन्नर तालुक्यातील एका आशा सेविकेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी या आळे येथे आशा सेविका म्हणून काम करतात. त्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर महिला उद्योग वर्धिनी या संस्थेबाबत माहिती देण्यात आली होती.
संस्थेकडून विविध गृहउद्योगांच्या माध्यमातून महिलांना घरपोच साहित्य देऊन, ते तयार करून परत दिल्यास दरमहिना ३० हजार रुपये उत्पन्न मिळेल, असे सांगण्यात आले होते. ५ जून २०२४ रोजी स्वारगेट येथील मराठा चेंबरच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शिराळकर दाम्पत्याने महिलांना आकाशकंदील, दरवाजाचे तोरण, जपमाळ यांसारख्या वस्तू तयार करण्याचे काम दिले जाईल, असे सांगितले. साहित्य पुरविण्याच्या नावाखाली प्रत्येकी ३ हजार रुपये घेतले गेले.
९० महिलांकडून एकूण २ लाख ७० हजार रुपये घेतल्यानंतर शिराळकर दाम्पत्याने कोणतेही साहित्य दिले नाही. पैसे परत मागितल्यावर त्यांनी विविध कारणे सांगून महिलांना टोलवाटोलवी केली. शेवटी महिलांना फसवणुकीचा मोठा धक्का बसला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पी. बी. शिरसाट अधिक तपास करीत आहेत.
