महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्वारगेट येथील जेधे चौकातील शंकरशेठ रोडवरून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून नेणारे लोखंडी चॅनल तुटल्यामुळे पाणी साचत होते. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या. तसेच तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाज होत असल्याने स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या.
या कालावधीत नवी चॅनल बसविणे, ड्रेनेज लाइनची स्वच्छता आणि मजबुतीकरणाची कामे केली जाणार आहेत. शंकरशेठ रोडवरील व्हेगा सेंटरकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी, जेधे चौकातील भुयारी मार्ग बंद असल्यामुळे, डावीकडील पर्यायी रस्ता वापरून पुढे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
