प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : भारतीय संस्कृती व मूल्ये जागतिक सौहार्द आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतीय संस्कृतीतील आध्यात्म आणि जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाचा सुंदर संगम घडविणारा सोहळा लंडन येथे पार पडला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरातील पूज्य प्रभुद्धमुनी स्वामी व पूज्य योगविवेक स्वामी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया उपस्थित होत्या. या दौऱ्यात लंडन, बर्मिंगहॅम आणि लेस्टर येथील नामांकित विद्यापीठांसोबत शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट होते.
या पार्श्वभूमीवर झालेला हा सन्मान सोहळा शिक्षण, संस्कार आणि आध्यात्म यांच्या अद्वितीय एकत्रीकरणाचे प्रतीक ठरला. बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय कला, वास्तुशास्त्र, सेवा आणि श्रद्धेचे द्योतक आहे.
युरोपमधील पहिले दगडी हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर प्राचीन वैदिक वास्तुशास्त्रानुसार स्टीलविना बांधले गेले आहे. भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारी ही अद्वितीय कलाकृती आहे.
समाजहितासाठी बीएपीएस संस्थेने केलेल्या कार्याचा व मूल्यप्रसाराचा गौरव करण्यासाठी ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आले. सन्मान स्वीकारताना पूज्य प्रभुद्धमुनी स्वामी व पूज्य योगविवेक स्वामी यांनी शिक्षण आणि अध्यात्माच्या माध्यमातून जागतिक समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र काम करण्याची भावना व्यक्त केली.
या भेटीमुळे सूर्यदत्त व बीएपीएस यांच्यातील संबंध अधिक बळकट झाले असून शिक्षण, अध्यात्म आणि जागतिक नागरिकत्वाचा संगम साधणारे हे नाते भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून जीवन जगण्याचे सामर्थ्य देणारे आहे. आध्यात्म मन व आत्म्यास शांती देणारे आहे. जेव्हा शिक्षण व आध्यात्म यांचा संगम होतो, तेव्हा व्यक्ती घडते, समाज समृद्ध होतो आणि राष्ट्र प्रगत होते. सूर्यदत्त व बीएपीएसचा हा सेतू भारतीय संस्कृती व मूल्ये अधिक दृढ करून जागतिक सौहार्द व सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देईल. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
