महसुल विभागाला जाग : अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : थेऊर येथे अनधिकृत प्लॉटिंग करताना ओढ्यात अतिक्रमण करून संरक्षणभिंत बांधून ओढ्याचे पात्र अरुंद करण्यात आले होते. अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी हे अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते वेळेत न हटवल्याने झालेल्या अतिवृष्टीत थेऊर येथील रुके वस्तीत पाणी शिरून मोठे नुकसान झाले. या महापुरानंतर महसुल विभागाला जाग आली असून ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण करणाऱ्या जमीनमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश जीवन उत्तमचंदानी आणि गोविंद जीवन उत्तमचंदानी (दोघे रा. सिरका हाऊस, एअरपोर्ट रोड, साकोरनगर, लोहगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ग्राम महसुल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी (वय ३७, रा. वाघोली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री थेऊर येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यात रुके वस्तीत ओढ्याचे पाणी शिरले आणि १०० हून अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. घरात पाणी शिरल्याने सर्व वस्तूंचे नुकसान झाले, तर काही शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी मंडल अधिकारी किशोर जाधव आणि ग्राम महसुल अधिकारी अर्जुन स्वामी यांना परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले. पाहणीदरम्यान थेऊर–केसनंद रोड लगतचा भाग जलमय होऊन पूरस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
सदर रोडलगतच्या गट नंबर ६६३ मध्ये अनधिकृत प्लॉटिंग होत असल्याची केस पूर्वीपासूनच लोणी काळभोर तहसील कार्यालयात दाखल होती. या जमिनीचे मालक राजेश व गोविंद उत्तमचंदानी यांनी संरक्षणभिंत बांधून ओढ्याचे पात्र अरुंद केले होते. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला.
अपर तहसीलदारांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते; मात्र जमीनमालकांनी आदेश धाब्यावर बसवून अतिक्रमण काढले नाही. त्यामुळेच अतिवृष्टीत ओढ्यातील पाणी साचून नैसर्गिक प्रवाह अडथळले आणि थेऊरमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाळे करत आहेत.
दुसऱ्या गुन्ह्यात दिलीप ज्ञानोबा कुंजीर, दत्तात्रय महादेव चव्हाण, सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) आणि प्रसादराव दत्ताजीराव पाटील (रा. थेऊर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अनधिकृत प्लॉटिंग करताना गट नंबर ६३ मध्ये प्रसादराव पाटील यांनी त्यांच्या क्षेत्रालगत संरक्षणभिंत बांधली. त्यामुळे नैसर्गिक ओढ्याचे पात्र अरुंद झाले आणि पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. याच कारणामुळे महापूर आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.
