फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोरमधील हातभट्टीवाले व गुंडांचा समावेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारे तसेच दहशत माजवून वारंवार गुन्हे करणारे नऊ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी केली.
फुरसुंगी येथील प्रेमलता मुकेश करमावत (४५, रा. मंतरवाडी, गणेशनगर, फुरसुंगी) हिच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याचे सहा गुन्हे दाखल आहेत. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंकज मुकेश करमावत (२५, रा. उत्तमनगर व शहनाई साडी सेंटरमागे, पुणे-सासवड रोड, मंतरवाडी) याच्यावर अशाच स्वरूपाचे चार गुन्हे नोंदले आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्यात शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद (१९, रा. आदर्श चाळ, राजीव गांधीनगर, सुखसागरनगर, अप्पर बिबवेवाडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सागर संदिप गुडेकर (२४, रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, हवेली) याच्यावर जबरी चोरी, हातभट्टीची दारू विक्री, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगणे असे चार गुन्हे आहेत.
याशिवाय, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील टोळीप्रमुख जाफर शाजमान इराणी (४३, रा. पठारे वस्ती) व त्याचे टोळी सदस्य मजलुम हाजी सय्यद (४८, रा. इराणी गल्ली, पठारे वस्ती, कदमवाक वस्ती), शब्बीर जावेद जाफरी (३८, रा. कदमवाक वस्ती), शाजमान हाजी इराणी (६२, रा. पठारे वस्ती, कदमवाक वस्ती) यांच्यावर फसवणूक, चोरी, दुखापत, मारहाण करणे, धमकावणे, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदा हत्यार बाळगणे असे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. या सर्व नऊ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
जानेवारी २०२५ पासून परिमंडळ ५ कार्यालयाकडून आतापर्यंत २० सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएप्रमाणे कारवाई, ११ मोका प्रकरणांतून ७६ गुन्हेगारांना अटक, तसेच ४१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
