पेट्रोल पंपावर टाकणार होते दरोडा : तिघे झाले पसार, चंदननगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चंदननगरमधील पत्र्याच्या शेडच्या बाजूला असलेल्या बोळात एकत्र आलेल्या टोळक्यापैकी दोघांना पकडण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून कोयता, तलवारीसह मिरची पावडर पोलिसांनी जप्त केली आहे. तिघे मात्र पळून गेले.
आकाश आनंद बेत्ती (वय २०, रा. एस. के. डेअरीमागे, बीडी कामगार वसाहत, चंदननगर) आणि अमोल वसंत घोरघडे (वय २३, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर योगेश संजय शिरसाठ (रा. वडगाव शेरी), साहिल शकील सय्यद (रा. गणेशनगर, वडगाव शेरी), आकाश भारत पवार (वय २३, रा. श्रीनगरी सोसायटी, आनंद पार्क, वडगाव शेरी) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत.
आकाश बेत्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये दोन आणि २०२५ मध्ये एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
याबाबत पोलीस अंमलदार ज्ञानोबा लहाने यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चंदननगर येथील ओम साई कृपा वॉशिंग सेंटरलगतच्या पत्र्याच्या शेडजवळील बोळात २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पावणेबाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, पोलीस अंमलदार कदम, डांगे, पाटील हे पेट्रोलिंग करताना चंदननगर भाजी मार्केट येथे आले. त्यावेळी त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओम साई कृपा वॉशिंग सेंटर येथे काही जण बोळात हत्यारे घेऊन थांबले आहेत.
ही माहिती खात्रीशीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आडोशाला थांबून पाहणी केली असता ५ ते ६ जण बोळात थांबलेले दिसले. पोलिसांनी अचानक धाड टाकली, त्यावेळी शेजारील झुडपांचा व अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले. मात्र पोलिसांनी दोघांना पकडले.
त्यांच्या जवळून कोयता, लहान तलवार आणि मिरची पावडरचे पॅकेट मिळून आले. चौकशीत समोर आले की खराडी बायपास रोडवरील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने ते एकत्र जमले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत.
