महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून चोरी, क्रेन, टेम्पो, रिक्षासह २९ लाखांचा माल जप्त : चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून औंध येथील बीएसएनएलच्या जुन्या लँडलाईनची अंडरग्राऊंड केबल चोरून नेणाऱ्या परराज्यातील टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले.
नसरुल बिलाल मोहम्मद (वय २३, रा. हरिजन कॅम्प, मंडावली, फाजलपूर, लक्ष्मीनगर, नवी दिल्ली), संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा (वय ३७, रा. साऊथ गणेशनगर, नवी दिल्ली), फईम अहमद शरीफ अहमद शेख (वय ४२, रा. कलवड वस्ती, लोहगाव) आणि वारीस फकीर मोहम्मद (वय ३५, रा. हरिजन कॅम्प, मंडावली, फाजलपूर, लक्ष्मीनगर, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून एक टेम्पो, एक रिक्षा, एक क्रेन, महापालिकेचे मजूर वापरत असलेले हेल्मेट, रिफ्लेक्टिंग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरिकेड्स, हातोडा, करवत, पहार, लोखंडी सत्तूर व चोरीला गेलेला माल असा एकूण २९ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
बीएसएनएल या सरकारी कंपनीने त्यांच्या लँडलाईन फोनसाठी महापालिकेच्या डकमधून केबल टाकल्या आहेत. औंध येथील परिहार चौकातील चेंबरमधून बीएसएनएल कंपनीची अंडरग्राऊंड असलेली फिनोलेक्स कंपनीची २०० मीटर लांबीची कॉपर केबल कोणीतरी चोरून नेल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकार्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावरून संगमवाडी येथे आलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी हे नवी दिल्लीतील असून तेथूनच ते टेम्पो घेऊन आले होते.
ते महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवत. यासाठी ते महापालिकेचे मजूर वापरतात तसे हेल्मेट, रिफ्लेक्टिंग जॅकेट घालत. स्थानिक क्रेनवाल्याला महापालिकेचे काम असल्याचे सांगून औंध येथे क्रेन बोलावली.
तेथील अंडरग्राऊंड असलेली बीएसएनएलची केबल त्यांनी काढून नेली. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा केबल चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननावरे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुल तांदळे, बाबासाहेब दांगडे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली.
