विजयी कामगिरीवर नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्याकडून सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : धाराशिव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भुम येथील मौलाली तालीमच्या पैलवानांनी दमदार प्रदर्शन करत शहराचे नाव उज्वल केले.
वस्ताद मामू जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान रोहित जाधव (४५ किलो), बंटी वाघमोडे (४८ किलो), टिपू जमादार (५५ किलो), रोहित माने (६० किलो), विराट उकरंडे (६५ किलो) आणि असलम जमादार (७४ किलो) यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून लातूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली.
या उल्लेखनीय यशाबद्दल नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे यांनी सर्व विजेत्या पैलवानांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सन्मान सोहळ्याला वस्ताद मामू जमादार, बाळासाहेब गवळी, मुशीर भाई शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सर्व तरुण खेळाडूंच्या यशाचे शहरभर कौतुक होत असून विभागीय स्तरावर त्यांच्या आणखी भव्य कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
