महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिरातील नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. अत्यंत भक्तिभावात शंभर महिलांच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी व भारती भंडारी, चेतन भंडारी व लीना भंडारी, विमलाबाई भंडारी आणि भंडारी परिवारासह प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण मुरारी यांच्या उपस्थितीत घटस्थापना होऊन देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरातील नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिराची अत्यंत मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.
यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असणार असून यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.
शंभर महिलांचा सहभाग असलेल्या विशेष ढोल पथकाचे ढोल-ताशा वादन हे आजच्या घटस्थापनेचे वैशिष्ट्य ठरले. आजपासून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्रीसुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवीसुक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ दरम्यान अभिषेक होणार आहे. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन व माता की चौकी होणार आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामधील विजेत्यांना ३२ इंच एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह व ब्लूटुथ स्पीकर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या वतीने शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे. याबरोबरच बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्र स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे.
माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्त्वाचे कार्यक्रम –
मंगळवार, २३ सप्टेंबर – वक्तृत्व स्पर्धा – सायं. ८
शुक्रवार, २६ सप्टेंबर – श्रीसुक्त पठण – सकाळी ७
शुक्रवार, २६ सप्टेंबर – महिला सशक्तीकरण चर्चासत्र – सायं. ७.३०
शनिवार, २७ सप्टेंबर – श्री देवीसुक्त पठण – दु. २
शनिवार, २७ सप्टेंबर – मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी – सकाळी १० ते दु. ४
सोमवार, २९ सप्टेंबर – नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ – सायं. ७.३०
बुधवार, १ ऑक्टोबर – नवरात्र स्पेशल फ्लॅश मॉब – सायं. ७.३०
मातेचा जागर करण्यासाठी या – पुणे शहरातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात अतिशय उत्साहात नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. याठिकाणच्या उत्सवात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. महिलांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावर्षी युवा पिढी स्पेशल फ्लॅश मॉब करणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी अवश्य या. – विजय भंडारी, अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट
