बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासे व्यापार्यांना धमकावून, गेल्या १२ वर्षांत आंदेकर टोळीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीतरीत्या गुन्हे करणे या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील टोळीयुद्धाविरुद्ध केलेल्या सक्षम व कठोर कारवाईमुळे, दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरिकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे.
या कारवाईमुळे मनोबल वाढल्याने, एका तक्रारदाराने गेल्या १२ वर्षांपासून बंडु आंदेकर टोळीचा दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली चालू असलेला खंडणी उकळण्याचा प्रकार उघड केला आहे.
या खंडणी प्रकरणात बंडु आंदेकर टोळीने आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त रक्कम मासे व्यापार्यांकडून व्यवसायासाठी जागा व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरशः कर्जबाजारी झाले असून, बंडु आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास व दहशतीमुळे ते सर्व प्रकार निमूटपणे सहन करत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध आक्रमक व कठोर कारवाई सुरू केली आहे.
याआधी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नागरिकांनी कोणत्याही दहशतीला न घाबरता, होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव पुढील तपास करत आहेत.
आंदेकरच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची कारवाई
आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर, आता त्याचा प्रभाव असलेल्या नाना पेठ व भवानी पेठ भागात पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने विविध अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत टपऱ्या, स्टॉल, अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा खून केला होता. या खून प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीतील १५ जणांना अटक केली आहे. नाना पेठेत बंडु आंदेकर याची गेल्या ४० वर्षांपासून दहशत आहे. तेथील व्यापार्यांकडून तो प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली लाखो रुपयांची खंडणी वसूल करतो. या परिसरात त्याने अनेकांना स्टॉल, टपऱ्या टाकून दिल्या व त्यांच्याकडून वर्षानुवर्षे खंडणी वसुली केली. त्या टपऱ्या, स्टॉल पोलिसांच्या संरक्षणात महापालिकेने उचलून नेल्या.
आंदेकर कुटुंबाचे उदात्तीकरण करणारे अनेक अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले होते. त्या सर्वांवर महापालिकेने कारवाई करून ते पाडून टाकले. आंदेकर टोळीचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी टोळीची चारही बाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. व्यापार्यांकडून घेतलेल्या खंडणीतून ही मालमत्ता मिळवल्याचे दाखवून, आंदेकर टोळीच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
