१२ किलो गांजासह ५ लाखांचा माल लोणी काळभोर पोलिसांनी केला जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्या रिक्षाचालकाला जेरबंद करून, लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. उरुळी कांचनकडून निगडीकडे रिक्षातून गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार करून या मार्गावरील सर्व रिक्षांवर पाळत ठेवली. थेऊर रेल्वे पूल सर्व्हिस रोडवर शेतजमिनीजवळ सकाळी सव्वा नऊ वाजता एक रिक्षा संशयास्पदरीत्या दिसून आली.
लोणी काळभोर पोलिसांनी रिक्षा आणि रिक्षाचालक यांना ताब्यात घेतले. त्यावेळी रिक्षामधील गांजा घेणारा पळून गेला. पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांचा १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा आणि रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गांजा कर्नाटकातून आणण्यात आला असल्याचे उघड झाले. कर्नाटकातून गांजा घेऊन येणाऱ्याने उरुळी कांचन येथे निगडीतील एकाकडे हा गांजा दिला. तेथून तो रिक्षाने हा गांजा घेऊन निगडीकडे जात होता.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार माने, सातपुते, वणवे, देवीकर, राहुल कर्डिले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, वीर, गाडे, शिरगीरे यांनी केली आहे.
















