विजेत्यांचा एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह, ब्लुटुथचे बक्षीस देऊन गौरव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील आशापुरा माता मंदिरात नवरात्र उत्सव सुरु आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरातील नवरात्र उत्सवाचे हे नववे वर्ष असून पहिल्यांदाच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत निधी खंडेलवाल यांना पहिले ३२ इंच एलईडी टीव्हीचे पारितोषिक मिळाले. तर, स्वप्नील बापट यांना दुसऱ्या क्रमांकाचे मायक्रोवेव्ह, दीप्ती शहा यांना ब्लुटुथ स्पीकर हे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
मिष्टी कुचेरिया यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे विचार मांडले. नवरात्र उत्सवासंबंधी स्पर्धकांनी त्यांच्या भाषणात माहिती दिली.
या वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, अमोल कुचेरिया आणि ट्रस्टचे सर्व सदस्यांचे योगदान आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महावीर जैन स्कूलच्या प्राचार्या डॉ. पल्लवी सोमन, सीए राधेश्याम अग्रवाल आणि जीतो अॅपेक्सच्या संचालक प्रियांका परमार यांनी काम पाहिले.
नवीन पिढीला आपले उत्सव व सणाला जोडण्यासाठी त्यांचा यामधील सहभाग वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा प्रयत्न माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने केला जात आहे. अनेकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. हे काम सामाजिक तसेच सांस्कृतिक व धार्मिक आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून नवीन पिढीचा उत्सवांमधला सहभाग वाढत आहे, ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी यावेळी सांगितले.
या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी होणार आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या वतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. याबरोबरच बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे.
माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्वाचे कार्यक्रम
शुक्रवार, २६ सप्टेंबर – श्रीसुक्त पठण – स. ७
शुक्रवार, २६ सप्टेंबर – महिला सशक्तीकरण चर्चासत्र – सायं. ७.३०
शनिवार, २७ सप्टेंबर – श्री देवी सुक्त पठण – दु. २
शनिवार, २७ सप्टेंबर – मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी – स. १० ते दु. ४
सोमवार, २९ सप्टेंबर – नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ – सायं. ७.३०
बुधवार, १ ऑक्टोबर – नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब – सायं. ७.३०















