प्रस्तावित रिंग रोडमधील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यांची प्रत देण्यासाठी मागितली होती लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रस्तावित रिंग रोडमधील अधिग्रहित जमिनीच्या ७/१२ तसेच ८ अ उताऱ्यांच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून पकडले. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर करण्यात आली.
या प्रकरणी हवेली तालुक्यातील तलाठी प्रेरणा बबन पारधी (वय ३०, रा. गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), दिपाली दिलीप पासलकर (वय २९, रा. काकडेनगर, कोंढवा) आणि शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (वय ४०, रा. मोरेवस्ती, मांजरी) या तिघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४२ वर्षीय तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांना सांगरुळ, बहुली, खडकवाडी व कुडजे गावांमधील अधिग्रहित जमिनींचे ७/१२ व ८ अ उताऱ्यांच्या प्रती आवश्यक होत्या. त्यासाठी त्यांनी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला.
प्रेरणा पारधी यांनी २४० प्रतींसाठी सरकारी फी व्यतिरिक्त १६,४०० लाच मागितली. दिपाली पासलकर यांनी १०६ प्रतींसाठी सरकारी फी व्यतिरिक्त ४,९१० लाच मागितली. शारदादेवी पाटील यांनी ३२ प्रतींसाठी सरकारी फी व्यतिरिक्त १,५२० लाच मागितली.
तक्रारीची पडताळणी करताना या तिघींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. २५ सप्टेंबर रोजी एसीबीने सापळा रचून शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून २,००० स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून पेन ड्राईव्ह, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा शिक्का, मोबाईल व १,१०० रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या कारवाईनंतर उर्वरित दोन्ही महिला तलाठ्या घटनास्थळावरून निघून गेल्या; परंतु त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने तिघींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.
